
पानवळात पुरातन वृक्षांचे होणार संवर्धन
ग्रामपंचायतीचा ठराव; १८६ वृक्षांचे नंबरींगसह जिओटॅगिंग
रत्नागिरी : माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत पानवळात पुरातन वृक्षांचे होणार संवर्धन करण्यात येणार आहे. गावातील पुरातन व औषधी वृक्ष न तोडण्याचा एकमुखी निर्णय पानवळ ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्याबाबतचा ठराव ग्रामपंचायतीत करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे गावातील या पुरातन व ऐतिहासिक आणि औषधी झाडांचे संवर्धन होईल.
माझी वसुंधरा ५.० अंतर्गत ग्रामपंचायत पानवळने ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकारी यांनी वृक्षगणना अहवाल प्रसिध्द केला. माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत ऐतिहासिक आणि औषधी झाडांचे संवर्धन करण्याची भूमिका ग्रामपंचायत पानवळ यांनी ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे वृक्षगणना कार्यक्रम आयोजित केला होता. वृक्षगणनेच्या वेळी जंगलातून फिरताना मोठमोठी इतिहासाची साक्षीदार असलेली विविध प्रकारची पुरातन झाडे पाहून पानवळ गावाची एक नव्याने ओळख ग्रामपंचायत सदस्यांना नव्याने पुढे आली.
करण्यात आलेल्या पहिला टप्प्यातील वृक्षगणनेत विविध स्थानिक १८६ प्रकारचे पुरातन वृक्ष आढळून आल्याचे नमूद करण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीत खूप मोठ्या आकाराचे पुरातन वृक्षांच्या सापडले. तसेच अनेक औषधी वृक्ष देखील दृष्टिक्षेपात आले. हे पुरातन वृक्ष जंगले आणि पाणवठे हिच या गावाची संपत्ती आहे यावर सदस्यांचे एकमत झाले. म्हणून झाडे ही निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन आहे असे म्हणत गावातील हे शिल्लक असलेले पुरातन वृक्ष वाचविण्यासाठी आता सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. असा निश्चय करून ग्रामस्थांनी ग्रामसभेत पुरातन वृक्षांचे संवर्धन करून ते न तोडण्याचा एक ऐतिहासिक ठराव घेतला आहे.
वृक्षगणनेत एकूण ६९,५९३ झाडांची नोंद करण्यात आली. गावातील पर्यावरण दूतांनी या अभियानात उत्साही सहभाग नोंदवला. यावेळी सरपंच तनिषका होरंबे, उपसरपंच रविंद्र मांडवकर, ग्रामपंचायत अधिकारी नयना पंगेरकर उपस्थित होते.