
‘त्या’ भामट्याकडून आणखी दोघांना ऑनलाईन गंडा
खेड
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत १४ लाख २८ हजार रुपयांचीं फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शशिकांत विठ्ठल मिरजकर (५५, रा. भाईंदर-ठाणे) याने आणखी दोघांना ऑनलाईन गंडा घातल्याचे समोर आले आहे. ४ लाख १५ हजार रुपयांची रक्कम स्वतःच्या खात्यात जमा करत वापरल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी भागुजी औटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी तपासाला गती देत मिरजकर याच्या राहत्या घरी मुसक्या आवळल्या. फसवणुकीतील ४ लाख १५ हजार रुपयांसह उर्वरित रक्कम हस्तगत करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. या भामट्याने आणखी दोघांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. फसवणूक झालेल्या ‘त्या’ दोघांच्या तक्रारी दाखल होताच त्या गुन्ह्यातही त्याला अटक करण्यात येणार असल्याचे समजते. या प्रकरणात अटक भामट्यापाठोपाठ आणखी काहींचा सहभाग असण्याचा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने पडताळा केला जात आहे.
अटक केलेला भामटा मिरजकर हा तीनबत्तीनाका येथील एका कॉम्प्लेक्समध्ये अनेक वर्षांपासून वास्तव्यास होता. याच ठिकाणी तो चाटे कोचिंग क्लासेस घेवून उदरनिर्वाह करत होता. याचदरम्यान, अनेक शिक्षक समुदायातील लोकांशी त्यांचा संबंध आला होता. रक्कम गुंतवणुकीबाबत विश्वास संपादन करत ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्याचे आणखी कारनामे उघड करण्यासाठी येथील पोलिसांनी कंबर कसली आहे.