
शतपावलीसाठी गेलेल्या तीन महिलांना बेदरकार दुचाकीस्वाराने उडविले
राजापूर : तालुक्यातील पाचल हनुमाननगर येथे रात्री जेवल्यानंतर शतपावलीसाठी गेलेल्या तीन महिलांना बेदरकार दुचाकीस्वाराने उडवल्याने तीन महिला जखमी झाल्याची घटना 5 मार्च रोजी रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद सौ. पुजा प्रशांत पांचाळ (२७ वर्षे, व्यवसाय गृहिणी रा. मु. पो. पाचल, हनुमाननगर ता. राजापुर जि. रत्नागिरी) यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार दुचाकी स्वार यशवंत राजेंद्र देसाई (४१ वर्षे रा.मु.पो. पाचल, पेठवाडी ता. राजापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, 5 रोजी रात्रीचे जेवणखाण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे पूजा पांचाळ या आपल्या शेजारच्या मैत्रिणी सौ. मंजुळा संतोष राठोड, सौ. सिमरन समीर घागरे व कु. सज्ञानी समीर घागरे अशा चौघीजणी पाचल ते तळवडे जाणारे रोडने चालत असताना मोटार सायकल (क्र. एम.एच.०४/एच.बी. ५४०७) चालक यशवंत राजेंद्र देसाई याने पाठीमागून धडक दिली. पूजा पांचाळ व सौ. मंजुळा संतोष राठोड यांना दुखापती झाल्या. तसेच डोक्याला किरकोळ दुखापती झालेल्या असुन सौ. सिमरन समीर घागरे यांचे कमरेला मुकामार लागलेला आहे. याप्रकरणी दुचाकी स्वार यशवंत देसाई याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास रायपाटण पोलीस दूरक्षेत्र चे ठाणे अंमलदार कमलाकर तळेकर करत आहेत.