
पोफळीत कोळशिंदांच्या हल्ल्यात दोन सांबर ठार, एक जखमी
चिपळूण:-
पोफळी-कुंभार्ली घाट परिसरात सध्या कोळशिंदांनी उच्छाद मांडला आहे. गेल्या काही दिवसांत परिसरातील तीन सांबरांवर हल्ला केला असून त्यामध्ये दोन सांबरांचा मृत्यू झाला, तर एक सांबर जखमी झाले आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
पोफळी-कुंभार्ली घाट परिसरात या पूर्वी कोळशिंदांनी एका गाईची शेपटी चावली होती. ही घटना ताजी असतानाच आता सांबरावर हल्ला केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोळशिंदे अधिक आक्रमकपणे आता इतर प्राण्यावर हल्ले करीत आहेत. काही दिवसांपूर्वी दोन सांबरांचे लचके तोडून त्यांना ठार केले. त्यांची दुर्गंधी पसरली आहे. दरम्यान, दोन दिवसात आणखी एका सांबरावर हल्ला करून त्याला जखमी केले आहे. त्यांचे डोळे फोडून
लचका तोडला आहे. त्याने शर्थीचे प्रयत्न कान आपला जीव वाचवला आहे. अशा घटना वारंवार घडत आहे. पोफळी-कुंभार्लीचा परिसर हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाजवळ आहे.
दरम्यान, यासंदर्भात येथील वनविभागाकडे संपर्क साधला असता, सांबरावर हल्ला हा जंगलात झालेला आहे. कोळशिंदांकडून शिकार ही त्यांची नैसर्गिक अन्नसाखळी असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.