
चाफेरी-कासारी रस्त्यासाठी आंदोलन करू
ग्रामस्थांचे निवेदन ; संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष
रत्नागिरी,: तालुक्यातील चाफेरी, कासारी, सांडेलावगण रस्तादुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला असून, ठेकेदाराने अजूनही काम सुरू केलेले नाही. या रस्त्याचे काम १५ दिवसात चालू न झाल्यास तिन्ही गावातील ग्रामस्थ आंदोलन करतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
ग्रामस्थांनी दिलेले निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. चाफेरी, कासारी, सांडेलावगण रस्ता दुरुस्तीसाठी २०२२ मध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमधून निधी मंजूर झाला आहे. ६.३७ किलोमीटर अंतरचा हा रस्ता असून, या परिसरात २५०० लोकवस्ती आहे. या रस्त्याचे काम संबधित ठेकेदाराने १९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्याचा कालावधी होता. २०२४ मे महिन्याच्या शेवटी ठेकेदाराने रस्ता रूंदीकरणाचे काम चालू केले. त्यानंतर पावसाळ्यात काम बंद होते तरीही नोव्हेंबर महिन्यात पाऊस गेल्यानंतर आज फेब्रुवारीअखेरीस ठेकेदाराने पुढील काम चालू केले नाही. रस्त्याची ही स्थिती पाहता या रस्त्यावरून वाहने चालवणे त्रासदायक झाले आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आला होता; परंतु तेही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्या रस्त्यावर एसटी चालकही वाहन चालवण्यास तयार नाहीत. त्यामुळे खंडाळा व जयगड येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या रस्त्याचे काम १५ दिवसात चालू न झाल्यास तिन्ही गावातील लोक मिळून आंदोलन करू. याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे ग्रामस्थांनी सांगितले.