
वाशिष्ठीतील गाळ उपशाचा चिपळूण शहराला लाभ
पुरापासून होणार सूटका; ५ लाख घनमीटर गाळ काढला
चिपळूण: येथील वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम सलग तिसऱ्या वर्षी सुरू आहे. पोफळीपासून दाभोळ खाडीच्या मुखापर्यंतचा गाळ तीन टप्यात काढला जाणार आहे. दोन वर्षात सुमारे ५ लाख घनमीटर गाळ काढण्यात यश आले आहे. त्यामुळे यंदा पुराच्या समस्येपासून चिपळूण शहर मुक्त राहिले.
वाशिष्ठीमधील गाळ काढण्यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमदार शेखर निकम यांच्या मागणीनूसार दहा कोटी रुपये मंजूर झाले. त्यानंतर मागीलवर्षी पालकमंत्री उदय सामंत यांनी पाच कोटीचा निधी दिला. त्यामुळे गाळ काढण्याचे काम वेगाने चालू राहिले. दोन वर्षात सुमारे ५ लाख घनमीटर गाळ काढला गेला. त्यासाठी नामचीही मदत मिळाली. या कामासाठी जलसंपदा खात्याच्या यांत्रिकी विभागाकडून इंधन आणि यंत्रणा पुरवण्यात आली आहे. मुसळधार पावसात गाळाच्या बेटामुळे शहरात येणारे नदीचे पाणी थेट दाभोळ खाडीच्या दिशेने वाहून गेले. वाशिष्ठीतील गाळ काढल्यामुळे गेल्यावर्षी शहरात पाणी भरले नाही, असा दावा चिपळूण बचाव समितीने केला आहे. गाळ काढताना वाशिष्ठी नदीतील बेटे काढली गेली. तसेच नदीचे पात्र रूंद आणि खोल करण्यात आले. चिपळूण शहराचा दरवर्षी पुराचा फटका बसतो. त्यातून शहरातील नागरिकांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी आता दरवर्षी गाळ काढण्याचे नियोजन केले आहे.
कोट
वाशिष्ठी नदीतील गाळ काढल्यानंतरही चिपळूण शहरात पाणी भरणारच आहे. मात्र शहरातील नागरिकांचे नुकसान होऊ नये, पुराची तीव्रता कमी व्हावी यासाठी गाळ काढणे गरजेचे आहे. पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम आणि जलसंपदा विभागाकडून त्यासाठी सहकार्य मिळत आहे. दरवर्षी गाळ काढत बसण्याऐवजी वाशिष्ठी नदीत गाळ येणारच नाही. यासाठी उपायोजना करणे गरजेचे आहे.
– शाहनवाज शाह, जलदूत चिपळूण