
अर्जुनेच्या कालव्यातुन पुर्ण क्षमतेने पाणी सोडण्याचा पाटबंधारे विभागाचा निर्णय!
दहा गावांमधील 15 हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार
राजापूर : तालुक्यातील पाचल भागामध्ये पाटबंधारे विभागातर्फे अर्जुना मध्यम धरण प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून या प्रकल्पातून परिसरातील गावांमधील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. दरम्यान, या कालव्यातून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याची नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आली असून परिसरातील बहुतांश गावांमध्ये पोहचल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.
अर्जुना नदीच्या काठावरील जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणून शेतीतुन अथार्जन करण्याच्या उद्देशाने पाचल येथे पाटबंधारे विभागातर्फे अर्जुना धरण प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून राजापूर आणि लांजा तालुक्यातील अनेक गावे सिंचनाखाली येणार आहेत. या धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर धरणातील पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कालवेही बांधण्यात आले आहेत.हे कालवा उभारण्याचे काम झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. त्यानुसार आज त्याची चाचणी घेण्यात आली. प्रतिसेकंद ३ घनमीटर पाणी या कालव्यातून वाहण्याची क्षमता आहे.
आज प्रतिसेकंद 2 घनमीटर पाणी कालव्यातून सोडले गेले. कालव्यातील पाणी शेतामध्ये नेण्यासाठी आउटलेट ठेवण्यात आलेले असून या आउटलेटमधून शेतकऱयांना शेतीसाठी पाणी घेण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आज सोडलेले पाणी वाघणगाव येथील शेवटच्या आउटलेटपर्यंत पोहचल्याची माहिती पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आली. कालव्यातील पाण्याद्वारे सुमारे दहा गावांमधील 15 हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून त्याचा लाभ हजारो शेतकऱ्यांना होणार आहे.