
रानकुत्र्याच्या हल्ल्यातून सांबराला वाचवले ग्रामस्थांनी
राजवाडीजवळील प्रकार ; जखमी सांबरावर उपचार सुरू
रत्नागिरी,
संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथील वहाळाजवल चार कोळसुंद्यानी (रानकुत्रे) सांबरावर हल्ला केला. हा प्रकार जवळच असलेल्या ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर त्या सांबराच्या पिल्लाला वाचविले. ही घटना काल (ता. २५) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडला. जखमी अवस्थेत असलेल्या सांबराच्या पिल्लाला ग्रामस्थांनी वन विभागाकडे सुपुर्द केले आहे. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.
संगमेश्वर, चिपळूण, गुहागर या परिसरात रानकुत्र्याचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. जंगल परिसरामध्ये हा प्राणी कळपाने राहतो. निसर्गाचा समतोल राखण्यात महत्वाची भुमिका बजावणारा प्राणी आहे. काल सकाळी राजवाडीजवळील एका वहाळावर दोन सांबरं पाणी पित होते. त्याचवेळी खाद्याच्या शोधात चार कोळसुंद पाणवठ्यानजिक शिकारीसाठी दबा धरून बसलेले होते. सांबर बेसावध असल्याचे लक्षात आल्यानंतर कोळसुंद्यांनी पिल्लावर हल्ला केला. छोट्या पिल्लाला पळून जाता आले नाही. या हल्ल्यात सांबराच्या डोक्यासह शरीरावर प्रचंड जखमा झाल्या. दुसरं सांबर पळून जाण्यात यशस्वी ठरले. हा प्रकार जवळच उभ्या असलेल्या ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यांनी सांबराचा जीव वाचविण्यासाठी कोळसुंद्यांना पळवून लावण्यासाठी धाव घेतली. मात्र टप्प्यात आलेली शिकार सोडण्याच्या मनस्थितीत ते कोळसुंदे नव्हते. त्यामुळे ग्रामस्थ आरडाओरड करित असतानाही कोळसुंदे पळून गेले नाहीत. ते शिकार सोडत नव्हते. मात्र सांबराला वाचविण्यासाठी ग्रामस्थांनीही कोळसुंद्यांवर हल्ला केला. घाबरून ते कोळसुंदे पळून गेले. वहाळापासून ग्रामस्थांची घरे काही अंतरावरच आहेत. जखमी अवस्थेत असलेल्या सांबराच्या पिल्लाला ग्रामस्थांनी सुरक्षितरित्या वन विभागाकडे सुपुर्द केले. आज सायंकाळपर्यंत सांबराची प्रकृती सुधारत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.