
चिपळूण-कराड रेल्वे प्रकल्पासाठी १० मार्चला बैठक
चिपळूण: कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या चिपळूण-कराड रेल्वे मार्ग अत्यंत महत्वाचा असून गेल्या काही वर्षापासून मागे पडलेल्या या रेल्वे प्रकल्पासाठी आपण येत्या १० मार्चला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांबरोबर बैठक घेणार आहोत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष रायगड-रत्नागिरीचे खासदार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
सावर्डेत राष्ट्रवादी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत चिपळूणचे पंचायत समिती माजी सभापती व अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम यांनी रखडलेल्या चिपळूण-कराड रेल्वेमार्गाचा प्रश्न उपस्थित केला होता. हा प्रकल्प मार्गी लागल्यास कोकण व पश्चिम महाराष्ट्राला फायदा होवू शकतो तसेच मध्य व कोकण रेल्वे ही कराड येथे एकत्र येवू शकते. त्याचा फायदा या दोन्ही रेल्वेमार्गाना होवू शकतो. आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिपळूण-कराड रेल्वेमार्गाच्या कामाचे ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजनही केले होते. मात्र त्यानंतर हा प्रकल्प रखडला आहे.