
बसच्या छताची झडप उडून चारचाकीवर आदळली
गुहागर : गुहागर आगाराच्या शिवशाही बसच्या छताची झडप उडून पाठीमागून येणाऱ्या चारचाकी गाडीच्या दर्शनी भागावर आदळली या घटनेत मोटारीची काच फुटून मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात मार्गताम्हाने अनंत शिर्के मंगल कार्यालयाजवळ सोमवारी (ता. २४) दुपारी एकच्या सुमारास अपघात झाला.
गुहागर आगाराची गुहागर ते चिपळूण ही दुपारी बारा वाजता सुटणारी शिवशाही वातानुकूलित बस मार्गताम्हाने शाळेच्या पुढे आल्यावर बसवरील छताचे झडप उडाले. बस वेगात असल्यामुळे झडप मागून येणाऱ्या मोटारीच्या दर्शनी भागावर जोरात आदळले. त्यामध्ये मोटारीची काच फुटली. आतील प्रवासी हे गुहागरला पर्यटनासाठी आले होते. ते पुन्हा कल्याणच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघाले होते.
या वाहनातील पर्यटक प्रवासी थोडक्यात वाचले. मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. हा प्रकार घडल्यानंतर घटनास्थळी रामपूर पोलिस दूरक्षेत्राचे पोलीस व गुहागर आगाराचे अधिकारीही दाखल झाले होते. या घटनेची नोंद गुहागर पोलिस ठाण्यात झाली आहे.