
‘सावंतवाडी-दिवा’ मधून महिलेचे सव्वालाखाचे दागिने लंपास
खेड
कोकण मार्गावरून धावणाऱ्या सावंतवाडी-दिवा एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे खेड ते दिवाणखवटी रेल्वेस्थानकादरम्यान १ लाख २५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञाताने लंपास केल्याची घटना घडली आहे.
शिला पांडुरंग थरवळ (६८, रा. विन्हेरे-महाड) असे या महिलेचे नाव असून त्यांनी नजीकच्या पोलिसात तक्रार नोंदवली आहे. त्या सावंतवाडी-दिवा एक्सप्रेसमधून पती व इतर नातेवाईकांसमवेत प्रवास करत होत्या. गाडीतील गर्दीचा फायदा उठवत अज्ञात चोरट्याने ३० ग्रॅम वजनाच्या त्यांच्याकडील सोन्याच्या पाटल्या लंपास केल्या. दागिने चोरीस गेल्याची बाब निदर्शनास येताच थरवळ यांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात धाव घेतली. ही घटना १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे नमूद करण्यात आले.
रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलांचे दागिने चोरीचे प्रकार पुन्हा वाढल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यानुसार सोमवारी सायंकाळी उशिरा अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.