
एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात शिवजयंती साजरी
रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय आणि एस. पी. हेगशेट्ये वरिष्ठ महाविद्यालयाच्या सामाजिक शास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.
प्रारंभी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे, प्रा. वर्षा कुबल, प्रा. प्रतीक्षा सुपल उपस्थित होत्या.
यानंतर आयेशा सावकार, वैष्णवी बांडागळे, इफ्फत ठाकूर, सानिया खतीब या विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य, त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, त्यांची वैचारिक धारा आपल्या मनोगतातून मांडली. प्रा. मेघना कोल्हटकर कविता सादर केली, तर प्रा. सचिन टेकाळे यांनीही छत्रपतींचे वैचारिक परिवर्तन, विज्ञाननिष्ठ उलगडून इतिहासातील चुकीच्या संदर्भांबद्दल परखडपणे मत व्यक्त केले.
यानंतर प्राचार्या डॉ. जगदाळे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा महिलांविषयी दृष्टिकोन’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
चेअरमन श्री. हेगशेट्ये यांनीही छत्रपतींच्या कार्याचा आढावा घेऊन संविधानाचा जागर खऱ्या अर्थाने छत्रपतींच्या कालखंडात झाल्याचे नमूद केले. महाराजांनी निढळेवाडी (ता. संगमेश्वर) येथे गलबताची बांधणी करणारा पहिला कारखाना सुरू केला, असे सांगतानाच मानवाच्या आयुष्यात वैचारिक स्पष्टतेला महत्त्व असून, हे आपल्याला महाराजांकडून मिळालेले देणं आहे, असे म्हणाले.
द्वितीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थी अद्वैत शेट्ये याने सूत्रसंचलन केले. प्रास्ताविक करताना प्रा. पूर्णिमा सरदेसाई यांनी महाराजांची केवळ जयंती साजरी न करता, केवळ मिरवणुका न काढता छत्रपतींचे विचार आचरणात आणायला हवेत, त्यांच्या विचारांचे वारस बनायला हवे, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. प्रा. वर्षा कुबल यांनी आभार मानले.
यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.