
कोकण रेल्वे मार्गावर रो-रो सेवेला उदंड प्रतिसाद
खेड : कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडने १९९९ पासून कोकण मार्गावर सुरू केलेल्या रो-रो सेवेला उदंड प्रतिसाद लाभत आहे. ‘रो-रो’ सेवांच्या मार्केटिंगसह ऑपरेशनसाठी मेसर्स अंजना ट्रेड अॅण्ड एजन्सीला देण्यात आलेला करार २४ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आला आहे. या पार्श्वभूमीवर ट्रक चालकांनी ‘रो- रो’ सेवांसाठी कोलाड व सुरतकल स्थानकांशी संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
गेल्या २५ वर्षांपासून कोलाड व सुरतकल स्थानकादरम्यान ‘रो-रो’च्या अखंडपणे सेवा चालवल्या जात आहेत. या सेवेमुळे ट्रक वाहतुकीत क्रांतीच झाली असून वेळेसह खर्चाचीही बचत होत असत्याने सेवेला भरभरून प्रतिसाद लाभत आहे. या ‘रो-रो’ सेवांच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाच्या तिजोरीतही तितकीच भर पडत आहे.
एजन्सीला देण्यात आलेला करार संपला असून ट्रक बुकिंगसाठी गैरसोय न होता सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ट्रकचालकांनी कोलाड व सुरतकल स्थानकांशी संपर्क साधण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. कोकण मार्गावर सुरू असलेल्या ‘रो-रोच्या सेवा भविष्यातही सुरू ठेवण्यात येणार आहेत. ट्रकचालकांना विश्वासार्ह आणि पर्यावरणपूरक वाहतूक पर्याय प्रदान करून सेवा पूर्णपणे कार्यरत ठेवण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. ‘रो-रो’ सेवा आणि दरांबद्दल अधिक माहितीसाठी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधण्याचे सूचित करण्यात आले आहे.