
खोपीतून दोन किलो गांजा जप्त
खेड:
तालुक्यातील खोपीनजीक गांजाची वाहतूक करताना एकाला पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास रंगेहाथ पकडले. संशयिताकडून पोलिसांनी दोन किलो गांजा जप्त केल्याचे. समजते. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कारवाई सुरू होती. त्यामुळे याबाबतचा अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.
पोलीस निरीक्षक भोयर पुन्हा अवैध धंद्यांविरोधात ‘ॲक्शन मोड’वर आले आहेत. यापूर्वी गुटखा विक्रेत्यांसह गांजाची विक्री करणाऱ्यांना चाप लावत ‘कनेक्शन’ही उघड केले होते. गावठी हातभट्टीच्या दारूसह मद्याची विक्री करणाऱ्यांविरोधातही पोलिसांचे धाडसत्र सुरूच आहे.
खोपीनजीक गांजाची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच पो. नि. भोयर व पथकाने सापळा रचला. या सापळ्यात गांजाची वाहतूक करणारा अलगद सापडला.
सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांकडून पंचनाम्याचे काम सुरू होते. संशयितांनी हा गांजा नेमका कुठून आणला आणि तो कोणाला विकणार होता, याबाबतचा पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता, गांजा वाहतुकीसह विक्रीचे नेमके कनेक्शन उघड करण्यासाठी पोलिसांकडून साऱ्या शक्यतांचा पडताळा करण्यात येत आहे. याबाबतचा अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकणी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर करत आहेत.