
जिल्ह्यात जीबीएसचा एकही रुग्ण नाही
रत्नागिरी: जिल्ह्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचा (जीबीएस) सुदैवाने एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र खबरदारीचा भाग म्हणून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सर्व तालुक्यांना याबाबत निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांनी सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यात सांगली व पुणे शहरात जीबीएस अर्थात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर या आजाराचे कारण शोधण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने एक पथक तयार केले आहे. त्याची तपासणी सुरू आहे.
आजाराची लक्षणे काय ?
गुइलेन बॅरे सिंड्रोम ही एक दुर्मीळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्यामध्ये तुमची रोगप्रतिकारक शक्ती मज्जासंस्थेवर हल्ला करते. यामुळे शरीरात अचानक तीव्र बधीरपणा, मुंग्या येणे, स्नायू कमकुवत होणे, अचानक हातापायांतली ताकद नष्ट होणे यासारखी लक्षणे दिसू शकतात, जी अर्धागवायू किंवा वात पोहोचू शकतात. आधी पाय नंतर हात आणि हळूहळू इतर अवयवांतील ताकद नष्ट होऊ लागते.
वेळेवर निदान आणि उपचार अतिशय गरजेचे असतात. उपचारानंतर बहुतेक लोक अगदी गंभीर जीबीएसमधूनसुद्धा पूर्णपणे बरे होतात. अचानक हाता-पायात येणारी कमजोरी, लकवा, डायरिया (जास्त दिवसांचा) अशी लक्षणे असतात.
जीबीएस आजाराचे रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात आढळलेले नाहीत. नागरिकांनी घाबरुन न जाता आवश्यक काळजी घ्यावी व अशी काही लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जि.प. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.