
नगरसेवक लहू कांबळे यांचे उपोषण स्थगित
लांजा : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेतील सन २०२२-२३ अंतर्गत ची कामे तात्पुरत्या स्वरूपात दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याबाबत कंत्राटदारारा सूचना देण्यात येईल असे लेखी आश्वासन मुख्याधिकारी हर्षला राणे यांनी दिल्यानंतर नगरसेवक लहू कांबळे यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजनेतील कामे ही लांजा न.पं. प्रभाग क्रमांक चार मधून अन्य प्रभागात वळवण्याच्या निषेधार्थ लांजा नगरपंचायतीचे नगरसेवक लहू कांबळे यांनी २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषण छेडले होते. आज सोमवारी सलग दुसऱ्या दिवशीही त्यांचे उपोषण सुरू होते. त्यामुळे सकाळ सत्रात त्यांची प्रकृती खालावली होती. मात्र त्यांनी तोपर्यंत आपल्याला ठोस लेखी स्वरूपात आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आपण वैद्यकीय उपचार घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते.
अखेर लहू कांबळे यांच्या आमरण उपोषणापुढे नगरपंचायत प्रशासन झुकले असून दलित वस्ती सुधार योजनेतील सन २०२२-२३ अंतर्गत ची कामे ही तात्पुरत्या स्वरूपात दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याबाबत संबंधित कंत्राटदाराल सूचना देण्यात येईल असे लेखी आश्वासन नगरपंचायत च्या मुख्याधिकारी हर्षला राणे यांनी उपोषणकत्या नगरसेवक लहू कांबळे यांची भेट घेऊन यांना दिले. त्यानंतर सोमवारी सायंकाळी लहू कांबळे यांनी आपले उपोषण थांबवले आहे.