
पवन तलाव मैदानावरील हुल्लडबाजांवर कारवाईची मागणी
चिपळूण: कोट्यवधी रूपये खर्च करून नूतनीकरण केलेल्या शहरातील पवन तलाव मैदानावर पुन्हा एकदा धनदांडग्या व्यक्तींच्या उडाणटप्पू मुलांनी आपल्या ताब्यातील चारचाकी वाहन घेऊन मैदानावर स्टंटबाजी केल्याचा प्रकार सहा महिन्यांच्या कालावधीत उघड झाला आहे. ऐन प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच ही घटना घडल्याची चर्चा असून मस्तवाल झालेल्या धनदांडग्या तरूणांनी चारचाकी वाहनातून मैदानात स्टंटबाजीची धुळवड केली. यामुळे मैदानाचे नुकसान झाले असून संबंधितांवर नगरपरिषद प्रशासनाने फौजदारी गुन्हे दाखल करून नुकसानभरपाई घ्यावी, अशी मागणी क्रीडाप्रेमी व शहरातील नागरिकांतून होत आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या पवन तलाव मैदानाचे आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून कोट्यवधी रूपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले. नूतनीकरण झालेल्या या मैदानाचा वापर शहरातील क्रीडा संस्थांसहीत विविध खेळाडूंना होत आहे. नूतनीकरणाचे काम सुरू असतानाच सहा महिन्यांपूर्वी पावसाळी हंगामाच्या सुमारास आपल्या ताब्यातील एक वाहन या मैदानात नेऊन स्टंटबाजी केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला. हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे निदर्शनास आला. त्यावरून क्रीडा प्रेमींतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
परिणामी, न.प. प्रशासनाने गंभीर दखल घेत संबंधितांकडून माफीनामा घेऊन नुकसानभरपाई घेतल्याचे समजते. ही घटना घडून सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लोटला असतानाच पुन्हा एकदा शहरातील काही मस्तवाल धनदांडग्या तरूणांनी याच मैदानात आपल्या ताब्यातील चारचाकी वाहनांनी अक्षरश: धुडगूस घातला. ही घटना प्रजासत्ताक दिनीच घडल्याची चर्चा आहे. हे तरूण चारचाकी वाहने घेऊन या मैदानात बेफामपणे धुरळा उडवित वाहन चालवून स्टंट करीत असल्याचा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे. त्यामुळे क्रीडा प्रेमींतून संताप व्यक्त होत आहे. प्रजासत्ताकदिनी ज्या मैदानावर ध्वजवंदन झाले त्याच मैदानावर मस्तवालपणाचा धुरळा उडवित स्टंटबाजी करणार्या या धनाढ्य कुटुंबातील तरूणांना प्रशासनाने जरब बसविण्याची गरज आहे.
न.प.चे दुर्लक्ष
नूतनीकरण अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून पवन तलाव मैदान चांगल्या दर्जाचे करण्यात आले आहे. संपूर्ण मैदानाला संरक्षक भिंत व दोन प्रवेशद्वार आहेत. त्यात मुख्य प्रवेशद्वाराला लागून छोटे प्रवेशद्वार आहे. या मैदानाच्या वापर करण्याच्या वेळेत प्रवेशद्वार उघडले जाते. त्यानंतर रात्रीच्यावेळी प्रवेशद्वार बंद केले जाते. तसेच या ठिकाणी सुरक्षारक्षक आहे. त्यानुसार न.प. प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. या छोट्या दरवाजातून काही तरूण मैदानात प्रवेश करून अनधिकृत प्रकार करीत असल्याचे निदर्शनास आले होते. मात्र, न.प.कडून योग्य कार्यवाही व खबरदारी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.