
आकाशवाणीचे निवेदक सुरेश भावे यांचे निधन
रत्नागिरी
रत्नागिरी आकाशवाणीवरील लोकप्रिय आवाज बनलेले सेवानिवृत्त निवेदक सुरेश भावे यांचे प्रजासत्ताकदिनी पुणे येथे दुःखद निधन झाले. निवेदक म्हणून कार्यरत असताना त्यांनी कीर्तनकार म्हणूनही ख्याती प्राप्त केली होती. सामाजिक कार्याचा वसा जपताना त्यांनी मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय घेतला.
भावे यांच्या निधनाने एक चांगला व्यासंगी कलाकार काळाच्या पडद्याआड गेल्याची, तसेच रत्नागिरी आकाशवाणीची ओळख ठरलेला आवाज हरपल्याची भावना आकाशवाणी श्रोतृवर्ग आणि कला क्षेत्रातून उमटत आहे. ज्येष्ठ रंगकर्मी, सूत्रसंचालक, दिग्दर्शक, प्रकाश योजनाकार, रंगभूषाकार, कीर्तनकार अशी त्यांची बहुआयामी ओळख होती.
सुरेश यांचा जन्म रत्नागिरी येथे २४ जानेवारी १९४६ रोजी सामान्य कुटुंबात झाला. शालेय शिक्षण विजयदुर्ग यदुर्ग व वाडा येथे तसेच इयत्ता नववीपासून फाटक हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर रत्नागिरीतील आय. टी. आय. मधून इलेक्ट्रिशियनचा कोर्स पूर्ण केला. सन १९७७ सालापासून ते आकाशवाणी रत्नागिरी केंद्रात निवेदक म्हणून सेवा करू लागले. आकाशवाणी कलाकार म्हणून श्रुतिका, नभोनाट्य, रूपके या आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांकडे अधिक लक्ष पुरवावे लागत असे. अभिनय जरी थांबवावा लागला तरीही रंगभूमीची सेवा वेगळ्या म्हणजेच निवेदनाच्या भूमिकेतून निवेदक म्हणून कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत असत.