
मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा
रत्नागिरीत भाजपचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी
रत्नागिरी : मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा मुंबईत झाल्यानंतर लगेचच रत्नागिरी शहर भाजपातर्फे फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. येऊन येऊन येणार कोण, भाजपाशिवाय आहे कोण, देवेंद्र फडणवीस आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. भाजपा शहराध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला.
शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल शेजारील भाजपा जिल्हा कार्यालयाच्या रस्त्यावर फटाक्यांची भलीमोठी माळ लावण्यात आली. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, वंदे मातरम, अशा घोषणा दिल्या. राज्यात महायुतीने विक्रमी आमदार निवडून दिले. त्यात भाजपाचे १३२ आमदार आहेत. या विजयाचे शिल्पकार असलेले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याने कार्यकर्त्यांना अत्यानंद झाला. या वेळी माजी नगरसेवक, मंदार खंडकर, मनोज पाटणकर, मंदार मयेकर, प्रशांत डिंगणकर, शैलेश बेर्डे, महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील, सुप्रिया रसाळ, महेंद्र मयेकर, शोनाली आंबेरकर, सायली बेर्डे, संपदा तळेकर, नीलेश आखाडे, संदीप रसाळ आदी उपस्थित होते.
दरम्यान, उद्या (५ डिसेंबर) सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. आझाद मैदानावरील या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण भाजपा कार्यालयाच्या रस्त्याशेजारी स्क्रिन लावून दाखवण्यात येणार आहे. जल्लोष विजयाचा हा कार्यक्रम साजरा होणार असून या वेळी फटाक्यांची आतषबाजी, लाडू, मिठाई वाटपही करण्यात येणार आहे. रत्नागिरी दक्षिण व रत्नागिरी उत्तर तालुका आणि शहराच्या वतीने हा सोहळा होणार असल्याचे तालुकाध्यक्ष दादा दळी व विवेक सुर्वे यांनी सांगितले.