
थंडीचा हंगाम सुरू; शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पेरण्यांची लगबग
रत्नागिरी : नोव्हेंबर अखेरीस थंडी पडू लागल्याने आणि दवाचे प्रमाणही वाढल्याने आता रब्बी हंगामातील पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे. दवाच्या सिंचनाबरोबर पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी शेतकर्यांचा रब्बीतील उत्पादन घेण्याकडे कल वाढू लागला आहे.
पावसाळा दीर्घकाळ लांबल्याने जिल्ह्यातील भात कापणीच्या कामांना उशीर झाला. दिवाळीनंतर सुरू झालेली भातकापणी आता जवळपास उरकली आहे.
शेतकर्यांनी भात खेरदी केंद्रावर लक्ष केंद्रीत केले असताना आता बदललेल्या वातावरणात रब्बी हंगामातील पेरण्या शेतकर्यांनी हाती घेतल्या आहेत. भातकापणी पूर्ण झाल्यानंतर पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी रब्बीसाठी पेरणी केली जाते.
अवकाळी पावसामुळे जमिनीत अद्यापही ओलावा आहे. जमिनीतील ओलावा कमी होण्यापूर्वी शेतकरी जमिनीची मशागत करून पेरणीच्या तयारीत व्यस्त झाले आहेत. लागवडीसाठी बी-बियाणे संकलन, नर्सरीतून रोपे खरेदी, जमिनीची मशागत, खते खरेदी करणे आदी कामांची लगबग आता सुरू झाली आहे.
यंदाच्या रब्बी हंगामात तृणधान्यात भात, मका, ऊस तर कडधान्यात वाटाणा हरभरा, मटकी, कुळीथ, वाल, चवळी, पावटा, चवळी, तूर, मूग, कडवा, वाटाणा या पिकांचा समावेश आहे. भाजीपाला पिकामध्ये वांगी, मिरची, टोमॅटो, कलिंगड पालेभाजी, कोथिंबीर, पालक, भेंडी, कारले, काकडी, घेवडा, गवार, दोडका, दुधीभोपळा, मूळा, माठ तर गळीत धान्यात सूर्यफूल, तीळ, भूईमूग, मोहरी या पिकांचा समावेश आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात रब्बी लागवडीकडे शेतकरी प्रोत्साहित व्हावा यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये बियाणांची उपलब्धता आणि पाण्यासाठी सौरपपंपाची अनुदान योजना लागू करण्यात आली आहे. रब्बी हंगामात जिल्ह्यात अल्प क्षेत्र लागवडीखाली असले तरी कृषी विभागातर्फे राबविण्यात येणार्या विविध योजनांना शेतकर्यांचा प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक शिवकुमार सदाफुले यांनी सांगितले.