
पोयनार-पाटीलवाडीतील ‘त्या’ दारू व्यावसायिकाला नोटीस
खेड : तालुक्यातील पोयनार-पाटीलवाडी येथे पोलिसानी बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या दारूधंद्यावर धाड टाकत सुजित सीताराम मोगरे (४५, रा. पाटीलवाडी) यास रंगेहाथ पकडले होते. त्याच्याकडून ३,५५० रूपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला होता.
पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्याने पोयनार-बौद्धवाडी येथील रहिवासी असल्याचे सांगितले होते. त्याची कागदपत्रे तपासली असता तो पाटीलवाडी येथीलच रहिवासी असल्याचे उघड झाले आहे. केवळ भीतीपोटी त्याने बौद्धवाडी येथील रहिवासी असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. येथील पोलिसांनी दारू व्यावसायिकाला नोटीस बजावली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.