
जिल्ह्यात २४३ एसटी बसेस पूर्ववत
रत्नागिरी: विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेकरिता जिल्ह्यातील पाच मतदार संघात वापरण्यात आलेल्या २४३ एसटी बसेस पूर्ववत प्रवाशांसाठी धावू लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी समाधानाचा नि:श्वास सोडला.
मतदान प्रक्रियेसाठी रत्नागिरी विभागातून २४३ एसटी बसेस प्रशासनाने ताब्यात घेतल्या होत्या. त्यामुळे दोन दिवस जिल्ह्यातील एसटी सेवा विस्कळीत झाली होती. १७०० मतदान केंद्रांसाठीचे साहित्य तसेच त्यासाठी कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी निवडणूक विभागाने एसटी बसेस, खासगी बसेस, जीप अशी वाहने आरक्षित केली होती. त्यामध्ये जिल्ह्याच्या नऊ आगारांतील २४३ बसेसचा समावेश होता.
रत्नागिरी विभागात एकूण ७५० गाड्या आहेत. त्यापैकी २४३ गाड्या निवडणूक कामांसाठी वळवण्यात आल्यामुळे ४३० गाड्यांमधूनच दोन दिवस प्रवासी वाहतूक सुरू होती. लांब पल्ल्यांच्या फेऱ्यांचे वेळापत्रक सुरळीत असले तरी ग्रामीण भागातील वेळापत्रक विस्कळीत झाले होते. फेऱ्या रद्द केल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. मतदानादिवशी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्यामुळे शालेय फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साहित्य घेऊन बसेस स्ट्राँगरूमकडे रवाना झाल्या. रात्री उशिरापर्यंत बसेस आगारात येत होत्या. गुरूवारपासून नियमित फेऱ्या सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.