
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्ट्यामुळे पावसाचा अंदाज
रत्नागिरी: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील किमान तापमानात हळुवारपणे वाढ होत असून, 28 नोव्हेंबरपासून ते 19 डिसेंबर असे तीन आठवडे राज्यात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात थंडी कमी राहील, असा अंदाज हवामानशास्त्रज्ञांनी दिला आहे.
गेले चार ते पाच दिवस कडाक्याची थंडी राज्यात पडण्यास सुरुवात झाली होती. मात्र, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचा अंदाज आहे. राज्यात बाष्पयुक्त वारे वेगाने येत असल्याने 28 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत हलक्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पुन्हा थंडी कमी होऊन किमान तापमानात सरासरीपेक्षा जास्त वाढ राहणार आहे. त्याची सुरुवात 23 नोव्हेंबरच्या पहाटेपासून दिसून आली. पहाटेच्या किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ झाल्याचे दिसत आहे.
उत्तरेकडील शीतलहरींनी आता कोकणकिनारपट्टीचा ताबा घ्यायला सुरवात केली आहे. त्यामुळे कोकणात बर्यापैकी थंडीचा माहोल सुरू झाला आहे. कमाल आणि किमान तापमानही घट झाल्याने रात्रीही गारठा जाणवू लागला आहे. हा आठवडा किनारपट्टी भागात थंडीचा प्रभाव राहणार असून तापमानातही घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण आणि दुर्गम भागात थंडीचा प्रभहाव जाणवू लागला आहे. सोमवारी सकाळी रत्नागिरी शहर आणि परिसरात कमाल तापमान आर्द्रतेसह 28 अंश सेल्सिअस एवढा नोंदविले गेले तर पहाटेही तापमानात कमालीची घट झाल्याने हुडहुडी भरविणारी थंडी पडली होती. सकाळी दहानंतर तापमानाने काही अंशी उचल घेतली तरी गारठा कायम होता. नोव्हबेंर अखेरीस बर्यापैकी थंडी पडू लागल्याने बागायतदरांमध्ये समाधान आहे. तापमानात उतार पडल्याने आंबा आणि काजूवर मोहोर प्रक्रिया सुरू होणारा आहे. त्यासाठी बागायतदारांनी थंडीचा अंदाज घेत फवारणीची तयारी सुरू केली आहे.