
‘जनशताब्दी’चे परतीच्या प्रवासाचे वेळापत्रक विस्कळीत
चिपळूण: कोकण रेल्वेमार्गावरील अतिजलद जनशताब्दी एक्स्प्रेसचे परतीच्या प्रवासाचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. गेले काही दिवस ही गाडी उशिरा मुंबईला पोहोचत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. मुंबईत पोहोचणाऱ्या प्रवाशांना रात्री उशिरा घर गाठावे लागत आहे. वंदे भरत ही रेल्वे वेळेत पोहोचावी आणि प्रवासी या रेल्वेकडे आकर्षित व्हावेत म्हणून रेल्वे व्यवस्थापनाकडून मुद्दाम जनशताब्दी एक्स्प्रेस उशिरा सोडली जात असल्याचा आरोप प्रवाशांमधून केला जात आहे.
मतमोजणीनंतर कोकणात आलेले मुंबईतील कार्यकर्ते सध्या परतीच्या मार्गावर आहेत. मुंबईला लवकर पोहोचता यावे यासाठी काही प्रवासी मांडवी तर काही जनशताब्दीला प्राधान्य देतात. ही रेल्वे आज तब्बल दोन तास उशिराने धावणार असल्याचे सांगण्यात आले. या रेल्वेला चिपळूणमध्ये थांबा नाही; मात्र ही रेल्वे पाणी भरण्यासाठी चिपळूणमध्ये थांबते. तेव्हा प्रवासी या रेल्वेत चढतात. ही रेल्वे आज उशिराने धावणार असल्याचे लक्षात आल्यानंतर काही प्रवाशांनी खेड रेल्वेस्थानक गाठले. तेथून त्यांनी वंदे भारत रेल्वेने मुंबईचा प्रवास केला.
कोकण रेल्वेमार्गावर मडगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल अशी नियमित जनशताब्दी एक्स्प्रेस धावते. मुंबई येथून पहाटे पाचला सुटून मडगावला दुपारी अडीचला पोहोचते. परतीच्या प्रवासासाठी मडगाव येथून दुपारी ३ वाजता सुटून पुन्हा मुंबईला रात्री १२ वाजता पोहोचते. सध्या ही गाडी एक ते दोन तास उशिराने धावत आहे. त्यामुळे मुंबईत पोचणाऱ्या प्रवाशांना रात्री दोन वाजेपर्यंत आपले घर गाठावे लागते. त्यामुळे या गाडीला प्रतिसाद कमी मिळू लागला आहे. प्रवाशांची नाराजीसुद्धा आहे. त्यामुळे या गाडीच्या वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.