रत्नागिरी, राजापूर मतदारसंघात बंडखोरांचे आव्हान
रत्नागिरी: विधानसभेच्या जागावाटपावरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली आहे. या उमेदवारीवरूनही काही मतदारसंघांत उमेदवारांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. बंडखोरीची लागण सर्वच राजकीय पक्षांमध्ये झाली आहे. रत्नागिरी व राजापूर मतदारसंघातील बंडखोरांचे मन वळवण्याचे मोठे आव्हान राजकीय पक्षांसमोर आहे.
जिल्ह्यातील दापोली-खेड, चिपळूण-संगमेश्वर, गुहागर, रत्नागिरी, लांजा-राजापूर, या पाच विधानसभा मतदारसंघांत रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्याने कोण कोण अर्ज भरणार, याकडे लक्ष लागले होते. जवळपास सर्वच ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. आता 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असल्याने आता किती बंडोपंत माघार घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा पाचव्यांदा आ. उदय सामंत (शिंदे गट, महायुती) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर शिवसेना (उबाठा, महाविकास आघाडी) कडून भाजपमधून नुकतेच दाखल झालेले बाळ माने यांना उमेदवारी जाहीर झाली. यामुळे उबाठा गटात अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळून वर आली आहे. माजी जि.प. उपाध्यक्ष उदय बने यांनी बंडाचे निशाण फडकवले. मंगळवारी त्यांनी शेवटच्या क्षणाला अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. यांचे बंड कायम राहते की पक्षश्रेष्ठी हे बंड थंड करण्यात यशस्वी होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघातसुद्धा बंडाचे ग्रहण चांगलंच लागलं आहे. विद्यमान आमदार राजन साळवी यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली. मात्र, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी बंडाचं निशाण हाती घेतले. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
गेल्या विधानसभा निवडणूकीतसुद्धा राजन साळवी विरूद्ध अविनाश लाड अशी लढत पाहायला मिळाली होती. यावेळी महायुतीकडून किरण सामंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अविनाश लाड यांनी बंडाचं निशाण खाली ठेवलं नाही, तर तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
जिल्ह्यात जवळपास सर्वच ठिकाणी बंडाचं निशाण पाहायला मिळत आहे. यामध्ये दापोलीत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे यांचा समावेश आहे. अंतिम चित्र 4 नोव्हेंबरपर्यंत स्पष्ट होईल. तोपर्यंत तरी या बंडोबांना थंड कसे करायचे, हे मोठे आव्हान सर्वच राजकीय पक्षांसमोर आहे.