रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षकांनी घेतली कोकणनगर येथे समन्वय बैठक
रत्नागिरी : शहर पोलीस ठाण्याचे नव्याने रूजू झालेले निरीक्षक सतीश शिवरकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कोकण नगर पोलीस चौकीमध्ये कोकणनगर पोलीस चौकी बीटअंतर्गत येणाऱ्या नागरिकांची समन्वय बैठक घेतली. यात त्यांनी नागरिकांना विधानसभा निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शनपर सूचना केल्या.
निवडणुकीच्या काळामध्ये व मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सूव्यवस्था अबाधित रहावा यासाठी श्री. शिवरकर यांनी या भागातील नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच पोलीस खात्यामार्फत ही योग्य ती खबरदारी घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
श्री. शिवरकर हे नव्याने पोलीस निरीक्षक म्हणून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामध्ये रुजू झाले असल्याने स्थानिकांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नौसीन काझी, भूषण सावंत, वैभव पाटील, हर्षराज पाटील, रोशन पालकर, इंलीयाज खोपेकर, मन्सूर नावडे, श्री. खान आदी मान्यवरांसह कोकणनगर बीटअंतर्गत येणारे सर्व पोलीस पाटील, चौकीतील पोलीस अधिकारी, तसेच असंख्य स्थानिक नागरिक उपस्थित होते.