
चिपळुणात टेम्पोची दुचाकीला धडक
चिपळूण : भरधाव वेगातील आयशर टेम्पोने दुचाकीला धडक देऊन अपघात केल्याची घटना गुरुवारी ४.५५च्या सुमारास तालुक्यातील मांडकी-भटवाडी परिसरातील वहाळफाटा ते पालवण जाणाऱ्या रस्त्यावर घडली. यात दुचाकी चालकासह अन्य एकजण जखमी झाला. या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात आयशर टेम्पोवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात सार्थक राजाभाऊ देवतशे (२१), हर्षवर्धन धनाजीराव शिंदे (२१, दोघे-चिपळूण) हे दोघजण जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पोवरील अज्ञात चालक सावर्डे ते पालवण असा टेम्पो घेऊन येत होता. तो वहाळफाटा ते पालवण जाणाऱ्या रस्त्यावर आला असता रस्ता चढ- उताराचा तसेच वळणाचा असतानाही त्याने टेम्पो अतिवेगाने चालवून तसेच रस्त्याची विशिष्ठ परिस्थितीकडे लक्ष न देता पालवण दिशेकडून दुचाकीवरुन आलेले सार्थक व हर्षवर्धनच्या दुचाकीला धडक दिली. यात ते दोघे जखमी झाले. या अपघातानंतर टेम्पो चालक न थांबता पसार झाला. या प्रकरणी सार्थकने दिलेल्या फिर्यादीनुसार सावर्डे पोलीस स्थानकात त्या अज्ञात टेम्पोचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.