
महिलासंबंधित सात महिन्यात १४९ गुन्हे बलात्कार, अपहरण गुन्ह्यात वाढ ; १४१ ची उकल
रत्नागिरी: महिलासंबंधित गुन्हे वाढू लागल्यामुळे पोलिस यंत्रणेसमोरही मोठे आव्हान उभे ठाकले आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत महिलांशी संबंधित १४९ गुन्हे जिल्हाभरात दाखल झाले असून, त्यापैकी १४१ गुन्हे उघड झाले आहेत. यात सर्वाधिक अपहरणासह बलात्काराचे प्रमाण अधिक आहे.
रत्नागिरी जिल्हा पूर्वी शांत जिल्हा म्हणून ओळखला जात असे. महिलांसाठीही अतिशय सुरक्षित असे वातावरण होते. त्यामुळे महिला, मुली निर्भयपणे बाहेर पडत होत्या. इतरही गुन्ह्यांचे प्रमाण तसेच कमी होते; मात्र आता वातावरण बदलले आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात कमी असले तरी अलिकडच्या काळात गुन्हेगारी वाढू लागली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेलाही अधिक सजग राहावे लागत आहे.
कोकण रेल्वे आल्यानंतर कोकणचा विकास होऊ लागला. व्यवसाय नोकरी, पर्यटन या निमित्ताने रत्नागिरीत येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रत्नागिरीतील औद्योगिक क्षेत्रात कामाला येणार कामगार वर्ग मोठ्या संख्येने बाहेरून येतो. त्यामुळे ही संख्या वाढायला लागली आहे. बाहेरून येणाऱ्यांच्या वाढत्या संख्येने गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. हे गुन्हे स्थानिकांकडून घडण्याची संख्या अगदी कमी आहे, असा पोलिसांचा अंदाज आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत महिलांविषयक विविध प्रकारचे १४९ गुन्हे घडले आहेत. पोलिस यंत्रणेच्या तत्परतेमुळे यापैकी १४१ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. तपासासाठी पोलिस आधुनिक सुविधांचा वापर करत असल्यामुळे गुन्ह्यांची उकल होण्यास चांगली मदत होत आहे.
जिल्ह्यात गेल्या सात महिन्यात महिलांविषयक दाखल गुन्ह्यांमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यांची दाखल संख्या सर्वाधिक ३० इतकी असून, हे सर्व उघड झाले आहे तर अपहरणाचे २६ गुन्हे आहेत. त्यापैकी २१ गुन्हे उघड झाले आहेत.