
सदैव जागृत राहिल्यास फसवणूक टाळणे शक्य : सीए मंदार गाडगीळ
सीए इन्स्टिट्यूटतर्फे विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
रत्नागिरी : डिजिटल पेमेंट, मेसेजवरून आलेली लिंक, अनोळखी नंबरवरून आलेला फोन अशा अनेक कारणांनी फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. भीती पोटी किंवा पैसै मिळणार आहेत म्हणून अनेक लोक या फसव्या लिंकला क्लिक करून फसतात. परंतु हे टाळण्याकरिता सदैव जागृत राहा, अनेकदा सुशिक्षित व्यक्तीसुद्धा ओटीपी देतात आणि फसवणुकीला बळी पडतात. हे टाळण्यासाठी कायम दक्ष राहिले पाहिजे, असे आवाहन सीए मंदार गाडगीळ यांनी केले.
सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे आर्थिक साक्षरता कार्यक्रमात बोलत होते. श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरिता या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
ते म्हणाले की, सर्व गोष्टींकडे बारकाईने पाहिले पाहिजे. काय केले तर काय होऊ शकते, याची माहिती घेतली पाहिजे. अनेकदा मोबाईलवर ओटीपी पाठवून फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. आपला बीएसएनएल कंपनीचा नंबर बंद पडणार आहे, शेअर मार्केटच्या नावाखाली, पैसे दुप्पट करून देतो, अशा विविध माध्यमातून फसवणूक केली जाते. ऑनलाईन पेमेंट करतानासुद्धा काळजी घेतली पाहिजे. आपला पासवर्ड कोणालाही सांगू नये. एटीएममधून पैसे काढताना काळजी घ्यावी. सायबर सिक्युरिटीची माहितीसुद्धा घेणे आवश्यक आहे. अनेकदा चांगले शिकलेले व्यक्ती, ज्येष्ठ नागरिकसुद्धा भीती पोटी माहिती देतात व फसवणूक होते. आपण सजग राहूनच आर्थिक व्यवहार केले पाहिजेत.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सीए इन्स्टिट्यूट शाखेच्या अध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये यांनी प्रास्ताविकामध्ये या कार्यक्रमाचा हेतू सांगितला. वकिलीच्या विद्यार्थ्यांना याची माहिती मिळण्याकरिता कार्यक्रम आयोजित केला. वित्तीय साक्षरता या विषयी सीए इन्स्टिट्यूट काम करत आहे. सीए इन्स्टिट्यूट ही देशाच्या विकासाकरिता भरीव योगदान देत असल्याने केंद्र सरकारच्या विविध उपक्रमात सहकार्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला सीए शाखेचे उपाध्यक्ष सीए शैलेश हळबे, सचिव सीए केदार करंबेळकर, कोषाध्यक्ष आणि पश्चिम भारत सीए विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सीए अक्षय जोशी, समिती सदस्य सीए प्रसाद आचरेकर विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. ॲड. रोहित देव यांनी स्वागत केले. सीए अक्षय जोशी यांनी आभार मानले.