
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सर्वच विभाग प्रमुखांनी नियुक्ती द्यावी : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह
रत्नागिरी, : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सर्वच विभाग प्रमुखांनी महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी आपापल्या विभागात नियुक्ती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी आज शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय जनकल्याणकारी योजनांचा संबंधित जिल्हास्तरीय यंत्रणांसमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी जिल्ह्यातील गर्भवती महिलांच्या प्रसूतीचे शासकीय रुग्णालयातील घटते प्रमाण, तसेच नैसर्गिक प्रसूती प्रमाणापेक्षा कुत्रिम प्रसुतींचे वाढते प्रमाण याचे पृथःक करण करून शासकीय वैद्यकीय सेवेचा उपयोग जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना मोफत व्हावा यासाठी तसेच पीएम विश्वकर्मा योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी संबंधित विभागांना मार्गदर्शन केले.
आढावा बैठकीमध्ये महिला व शाळा सुरक्षेचा आढावा घेवून संबंधित सर्व विभागांना या संदर्भात आवश्यक त्या सूचना केल्या. स्कूल बसेसमधील सुरक्षा, नशा मुक्त भारत व अंमली पदार्थ विरोधी कार्यवाही, तसेच येणाऱ्या गणेशोत्सव काळात वाहतूक नियंत्रण, साथ रोग नियंत्रण, गणेश मूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षा, वीज पुरवठा अखंडित ठेवणे, रस्त्यांची दुरुस्ती, प्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या खाद्य पदार्थांची तपासणी इत्यादी बाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा काय प्रशिक्षण योजना, आरोग्याच्या योजना, मुख्यमंत्री अन्नूपर्णा योजना,पीएम विश्वकर्मा योजना, वयोश्री योजना, लखपती दिदी योजना आदी योजनांचाही यावेळी जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी आढावा घेतला.