
कांटे कातळकोंड सड्यावर वीस कातळशिल्पे
संशोधकांसाठी जिव्हाळ्याचा विषय; मानवासह पशुपक्ष्यांची रेखाचित्रे
मंडणगड: तालुक्यातील धामणी येथे सापडलेल्या एका कातळशिल्पानंतर या गावाच्या अंतरापासून केवळ पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरील कांटे-कातळकोंड या गावात वीस कातळशिल्पांचा खजिना सापडला आहे. या शिल्पांमध्ये मानवी आकृती, पक्षी व प्राण्यांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. कोकणातील जांभ्या कातळात मोकळ्या माळरानांमध्ये सापडलेली कातळशिल्पे ही शिल्प संशोधकांसाठी जिव्हाळ्याचा विषय ठरणार आहेत. त्या सर्व कातळशिल्पांचे संवर्धन झाल्यास पर्यटनाला वेगळा आयाम मिळणार आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातळभागात शिल्पे आढळून आली आहेत. त्यामध्ये राजापूर तालुक्यात बारसू, देवाचेगोठणे येथे मोठ्या संख्येने शिल्पे सापडली आहेत. उंबर्ले, धामणी या ठिकाणी शिल्प आढळले. बारसूनंतर इतक्या मोठ्या संख्येने कांटे येथे शिल्पे सापडल्याने त्यांचे तातडीने संशोधन व संगोपनाचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. कोकणातील सड्यांवर यापूर्वी आढळलेल्या कातळशिल्पांतील रेखाचित्रांप्रमाणेच येथे चित्रे आढळून आली आहेत. ही कातळशिल्पे नेमकी कोणत्या कालखंडातील खोदलेली असतील किंवा किती वर्षे जुनी असतील याचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. कातळशिल्पे कांटे व कातळकोंड या गावांपासून जवळ असली तरी शिल्पे असलेला कातळभाग किंवा हा सडा आजूबाजूच्या गुडेघर, पन्हळी, जावळे, आंबवली, रानवली या गावांच्या मधोमध असलेल्या जंगल परिसरामध्ये पसरलेला आहे. या भागाचे सरकारी दप्तरी सातबाऱ्यावर कातळमाळ हे नाव आहे. सड्यावर असलेल्या कातळमाळावर दोन ऐरणी आहेत. या दोन ऐरणीदरम्यान ही सर्व लहान-मोठी कातळशिल्पे कोरलेली आहेत. यामध्ये एक मानवी आकृती, वेगवेगळ्या आकाराचे मासे, गाय, बैल, बकरी, मुंगुस, शंकराची पिंड आणि इतर वेगवेगळी न समजता येईल, अशी लहान-मोठी वीस कातळशिल्पे बघायला मिळतात. या कातळशिल्पे असलेल्या भागापासून जवळच जंगलात उंच टेपावर एक पाणबुरूजसुद्धा आहे. त्याला बाबुलटेंबा असेही म्हणतात.
कोट
या कातळशिल्पांमध्ये जलचर, भूचर, उभयचर अशा पद्धतीची वैविध्यता दिसून येते. रत्नागिरी जिल्ह्याच्या अगदी उत्तर भागामध्ये आढळून आलेली ही कातळशिल्पे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आणखीन या भागात अशा प्रकारची कातळशिल्पे आढळून येण्याची शक्यता आहे. संबंधित जमीनमालकांनी या कातळशिल्पांचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन त्याचे जतन आणि संवर्धन करावे यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यामुळे त्यांच्या जागेलादेखील महत्व प्राप्त होणार आहे.
- डॉ. अंजय धनावडे, पुरातत्त्व अभ्यासक