
देसाई कारखान्यातील चोरीचा तपास युद्धपातळीवर
रत्नागिरी:- पावस येथील सुप्रसिद्ध देसाई यांच्या आंबा प्रक्रिया कारखान्याचे कार्यालय फोडून हजारो रुपयांची चोरी केल्यानंतर तपास वेगाने सुरु करण्यात आला आहे. लवकरच चोरटे हाती लागतील असा विश्वास पूर्णगड पोलिसांनी व्यक्त केला आहे.
१५ जून रोजी रात्री दीड ते अडीच वाजण्याच्या दरम्यान अमर देसाई यांच्या आंबा प्रक्रिया कारखान्यात कार्यालयाचे ग्रील कटावणीने उचकटून तीन चोरट्यांनी आत प्रवेश केला. चोरट्याने कार्यालयाच्या टेबल ड्रावरमध्ये ठेवलेले ३० हजार रुपये चोरुन नेले. ही घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली असून त्यात तीन जण इमारतीत प्रवेश करत असल्याचे दिसून येत आहे.
यापूर्वी ८ जूनला मेर्वी येथे घरफोडी करून चोरट्यांनी ४५ हजार रुपये लंपास केले होते. त्यानंतर. १० जूनला गणेशगुळे गणपती मंदिरात दानपेटी फोडून ५ हजार रुपयाची रक्कम लांबवली होती. यानंतर निरुळ येथील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरुन नेल्या होत्या.
पावस परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरु असून त्याचा तपास लागत नसल्याने सुरक्षा यंत्रणा हैराण आहेत. तपासाचे कार्य प्रगतीपथावर असून लवकरच चोरट्यांना आम्ही पकडू असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात चोरट्यांचा मागमूस लागत नसल्याने यंत्रणेवर नामुष्की ओढवली आहे.