
पूरप्रवण, दरडप्रवण ८८ गावांना सतर्कतेच्या सूचना
संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने बचावसाहित्य सज्ज ; नुकसान झाल्यास तत्काळ पंचनामे
रत्नागिरी, ः पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने रत्नागिरी तालुक्यातील तसेच शहर परिसरातील किनाऱ्यालगत असलेली गावे, पूरप्रवण तसेच दरडप्रवण गावे यांच्याकडे अधिक लक्ष केंद्रित केले जात असून, या ८८ गावांना सतर्कतेच्या सूचना तहसीलदारांकडून देण्यात आल्या आहेत. आपत्तीचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या बचाव साहित्यांची सुसज्जता ठेवण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी पावसाळ्याच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांकडून आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून घेतला आहे. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यांनीही आराखडा तयार ठेवला आहे. त्यानुसार पावसाळ्यात येणाऱ्या आपत्तींशी सामना करण्याच्या अनुषंगाने रत्नागिरी तालुक्यात शोधकार्य आणि मदतकार्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्यांची सज्जता तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यात नदीकिनारी तसेच समुद्र-खाडीकिनारी असलेली ५७ गावे, पूरप्रवण असलेली ८ गावे आणि दरडप्रवण असलेली २३ गावे अशा ८८ गावांकडे विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. तालुक्यातील धरणांमधील पाणीसाठ्यावर तसेच धरणात पडणाऱ्या पावसाची नियमित नोंद केली जात आहे. तालुक्याचा नियंत्रणकक्ष २४ तास सुरू ठेवण्यात येत असून, रत्नागिरी नगर पालिकेनेही नियंत्रण कक्ष सुरू ठेवला आहे. तालुक्याचा आरोग्यविभाग तसेच अन्य विभाग यांना सजग राहण्याच्या सूचना रत्नागिरी – संगमेश्वरचे उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी दिल्या आहेत. अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानाचे प्राथमिक स्तरावर पंचनामे करण्यात आले आहेत. सध्या पाऊस सुरू असल्याने तालुक्यात होणाऱ्या नुकसानाच्या पंचनाम्यांनाही सुरवात झाली आहे. पूरप्रवण गावांमध्ये हरचिरी, चांदेराई, टेंभ्ये, पोमेंडीखुर्द, उक्षी, सोमेश्वर, पोमेंडीबुद्रुक, पावस यांचा समावेश आहे तसेच दरडप्रवण गावांमध्ये रावणंगवाडी, चांदेराई, नाणीज, बेंद्रेवाडी, उमर, कारवांचीवाडी, टेंभ्ये, पानवल, कर्ला, शिरगाव, मालगुंड, हरचेरी, टिके, सोमेश्वर, घवाळीवाडी, गडनरळ, वेळवंड, नाचणे, खेडशी, शिरगाव, पावस, झाडगांव, जमातवाडीचा समावेश आहे.
हरचेरी बौद्धवाडीचा पुनर्वसनासाठी प्रस्ताव
पुणे येथील भूवैज्ञानिकांनी जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांचे सर्वेक्षण केले. त्यात १३९ गावांचा समावेश दरडग्रस्त करण्यात आला असून, त्यात तालुक्यातील हरचेरी बौद्धवाडीचा समावेश आहे. या वाडीच्या पुनर्वसनासाठीचा प्रस्ताव रत्नागिरीचे प्रांत जीवन देसाई यांच्याकडे तहसीलदार म्हात्रे यांच्याकडून देण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.