
तुतारी एक्स्प्रेसमधून ४० हजारांची रोकड लंपास
चिपळूण :कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसमधून प्रवाशाची बॅग चोरीस गेली. या बॅगेतील ४० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे.
योगेश सुरेश मेस्त्री (३७) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मेस्त्री हे मंगळवारी तुतारी एक्स्प्रेसने दादरहून रत्नागिरी असा प्रवास करत होते. या प्रवासात मेस्त्री यांची बॅग चिपळूणदरम्यान चोरीला गेली. यावेळी त्यांनी आजूबाजूला शोधली असता ती मिळाली नाही. त्या बॅगेत रोख ४० हजार रुपये होते. याबाबत चिपळूण पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वेतील चोरीच्या घटना पुन्हा वाढल्या आहेत.