सीमेवरील जवानांसाठी पाठविल्या स्वहस्ते तयार केलेल्या राख्या
महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा स्तुत्य उपक्रम
रत्नागिरी:
शिरगांव येथील महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरीच्या विद्यार्थिनींनी सीमेवर अहोरात्र देशसेवा करणाऱ्या सैनिकांसाठी एक अत्यंत भावनिक आणि देशभक्तीपर उपक्रम राबवला आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रमुख श्रुती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या स्नेहा कोतवडेकर यांच्या विशेष प्रयत्नांतून बी.सी.ए. द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी स्वतःच्या हातातून आकर्षक राख्या तयार केल्या आहेत.
रक्षाबंधनासारख्या पवित्र सणाला आपल्या बहिणींपासून दूर सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांना राखी बांधता येत नाही, त्यांच्या या बहिणींच्या प्रेमाची उणीव भरून काढण्यासाठी विद्यार्थिनींनी हा उपक्रम हाती घेतला आहे. या राख्यांमुळे सैनिकांचे मनोबल नक्कीच उंचावेल आणि त्यांना आपल्या बहिणींच्या प्रेमाची प्रचीती येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
महाविद्यालयाच्या प्राध्यापिका आणि विद्यार्थिनींनी या राख्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जाऊन सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. विद्याधर ताटे यांच्याकडे सुपुर्द केल्या. यावेळी कार्यालयातील इतर कर्मचारीवृंद देखील उपस्थित होते.
सध्या जम्मू व काश्मीर सीमेवर तैनात असलेल्या ६/१ गोर्खा रायफल्स या बटालियनच्या वीर जवानांपर्यंत या राख्या पाठविण्यात येणार आहेत. सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. विद्याधर ताटे यांनी विद्यार्थिनींच्या या उपक्रमाचे जाहीर कौतुक करत महाविद्यालयाचे मनःपूर्वक आभार मानले.