मुंबई ते कोकण जलप्रवासाला मिळणार नवी संजीवनी
देशातील पहिल्या १०० टक्के इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल बोटीची यशस्वी चाचणी
मुंबई : मुंबई आणि कोकणला लाभलेल्या विस्तीर्ण किनारपट्टीच्या माध्यमातून आता मुंबई ते कोकण, अलिबाग आणि रायगड असा वेगवान व प्रदूषणमुक्त जलप्रवास करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आले आहे. डिझेल बोटींवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि सागरी वाहतूक अधिक आधुनिक करण्यासाठी स्वीडनमधून आयात केलेल्या देशातील पहिल्या १०० टक्के इलेक्ट्रिक ‘कॅन्डेला पी-१२’ हायड्रोफॉईल बोटीची चाचणी यशस्वीरीत्या पार पडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ही महत्त्वपूर्ण चाचणी घेण्यात आली असून, यामुळे कोकणसह मुंबईकरांच्या जलप्रवासाला मोठी संजीवनी मिळणार आहे.
सद्यस्थितीत मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा तसेच अलिबाग-मांडवा या मार्गांवर चालणाऱ्या पारंपरिक डिझेल फेरी बोटींची अवस्था फारशी समाधानकारक नसून त्यांचा वेग कमी असतो आणि मोठ्या प्रमाणात प्रदूषणही होते. मात्र, महाराष्ट्र सागरी महामंडळ आणि पोर्ट ट्रस्ट यांच्या सहकार्याने सागरी प्रवासातील हा नवा टप्पा गाठला जात आहे. महाराष्ट्र सरकार, रुरल एनहान्सर्स ग्रुप आणि साधव शिपयार्ड्स लिमिटेड यांच्या या संयुक्त उपक्रमांतर्गत सादर झालेल्या या आधुनिक बोटीमुळे प्रवाशांना मुंबईतून थेट कोकणात, अलिबाग, एलिफंटा आणि बेलापूरपर्यंत अतिशय आरामदायी प्रवास करता येणार आहे.
सध्या देशात कोच्ची येथे सागरी वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीचा यशस्वी वापर केला जात आहे. परंतु, या नवीन १०० टक्के इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे या बोटीचा वेग अत्यंत जास्त असून ती स्पीड बोटप्रमाणे पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत वेगाने अंतर कापते. या यशस्वी चाचणीमुळे राज्यातील रखडलेले आणि दुर्लक्षित राहिलेले जलवाहतुकीचे मार्ग पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सक्रिय होण्याची मोठी आशा निर्माण झाली असून प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाचण्यासोबतच पर्यावरण रक्षणालाही मोठी मदत होणार आहे.