शिवशाही बसच्या धडकेत मंडणगडातीलदुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; एक गंभीर
मंडणगड:
मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे ब्रिजजवळ भरधाव शिवशाही बसने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा चुलत भाऊ गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना आज सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास कामत हॉटेलपासून सुमारे २०० मीटर अंतरावर घडली. विकास मोगरे असे मृत तरुणाचे नाव असून, अभिषेक मोगरे असे जखमीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास मोगरे आणि त्यांचा चुलत भाऊ अभिषेक मोगरे हे दोघे बंधाऱ्याच्या कामासाठी आपल्या एक्टिवा दुचाकीवरून मुंबईहून मंडणगडच्या दिशेने निघाले होते. सकाळी सव्वा आठच्या सुमारास ते नागोठणे ब्रिज परिसरात आले असता, श्रीवर्धन एसटी डेपोच्या भरधाव शिवशाही बसने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की दोघेही भाऊ रस्त्याच्या वेगवेगळ्या बाजूला फेकले गेले. दुर्दैवाने, दुचाकीवर मागे बसलेले विकास मोगरे यांच्या पोटावरून बसचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, दुचाकी चालवणारे अभिषेक मोगरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या नागोठणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच नागोठणे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित एसटी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, नागोठणे पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.