रत्नागिरीत आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर
पालकमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती
रत्नागिरी :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरी प्रांताधिकारी आणि तहसीलदार कार्यालयाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन बुधवार 22 जुलै रोजी सकाळी 11 वा. जयेश मंगल कार्यालयात करण्यात आले आहे.
या कार्यक्रम पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्यासह जि.प., पंचायत समिती व नगरसेवक लोकप्रतिनिधी आणि विविध खात्यांचे अधिकारी, सर्व पोलीस पाटील उपस्थित राहणार आहेत.
राज्यात 22 जुलै, 25 जुलै व 26 जुलै या तीन दिवसांपैकी एका दिवशी प्रत्येक विधानसभा निहाय समाधान शिबिरांचे आयोजनाचा निर्णय शासनाने घेतला आहे. रत्नागिरी विधानसभेमध्ये पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला विधानसभा मतदार संघातील नागरिक, विविध शासकीय योजनांचा लाभ घेणार्या नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रांताधिकारी जीवन देसाई व तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केले आहे.