रत्नागिरीत महानगर गॅस कनेक्शनचे बिल भरण्याच्या बहाण्याने ७६ वर्षीय वृद्धाला ५.५६ लाखांचा गंडा
रत्नागिरी : महानगर गॅस एजन्सीमधून बोलत असल्याची बतावणी करून आणि व्हॉट्सॲपवर बनावट ॲप्लिकेशन फाईल पाठवून सायबर भामट्यांनी एका ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ५ लाख ५६ हजार ६९१ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ११ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत कर्ला कारेकरवाडी येथे ही घटना घडली असून, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कर्ला कारेकरवाडी (घर नं. ७४२, ता. जि. रत्नागिरी) येथील रहिवासी जिक्रीया आदम फणसोपकर (वय ७६, व्यवसाय – वर्कशॉप) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.४० वाजल्यापासून ते १३ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला. या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने फणसोपकर यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. समोरून बोलणाऱ्या भामट्याने आपण महानगर गॅस एजन्सीमधून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे गॅस कनेक्शनचे बिल भरलेले असून, ते बिल ॲक्टिव्हेट करण्यासाठी तुम्हाला केवळ १० रुपयांचा रिचार्ज मारावा लागेल, असा बनाव त्याने रचला.
या बोलण्यावर विश्वास बसल्यानंतर भामट्याने फणसोपकर यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर ‘Mahanagar Gas’ नावाची एक संशयास्पद ॲप्लिकेशन फाईल पाठवली. फणसोपकर यांनी ती फाईल ओपन करून त्यामध्ये आपले पूर्ण नाव भरले आणि ॲप्लिकेशनवर येणारे सर्व कॉलम ‘ओके’ करत गेले. या तांत्रिक जाळ्यात अडकताच सायबर भामट्याने त्यांच्या मोबाईलचा ताबा मिळवून त्यांच्या कॅनरा बँकेच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने एकूण ५ लाख ५६ हजार ६९१ रुपये परस्पर काढून घेतले.
आपल्या बँक खात्यातून एवढी मोठी रक्कम वळती झाल्याचे लक्षात येताच फणसोपकर यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी तात्काळ १४ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३.३९ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(अ) आणि ६६(ड) अन्वये गुन्हा (गु.र.नं. ४६७/२०२६) दाखल केला आहे. सायबर भामट्यांकडून अशा प्रकारे व्हॉट्सॲपवर एपीके (APK) फाईल पाठवून बँक खाती रिकामी करण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांनी अनोळखी लिंक किंवा फाईल डाउनलोड करू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. रत्नागिरी शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.