मार्लेश्वर घनदाट जंगलात आढळले दुर्मिळ शेकरू
जैवविविधतेची पुन्हा प्रचिती
देवरूख: राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध स्वयंभू श्री मार्लेश्वर देवस्थान परिसरातील घनदाट जंगलात महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेला दुर्मिळ ‘शेकरू’ आढळून आला आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या मार्लेश्वर परिसराचे धार्मिक महत्त्व सर्वश्रुत असतानाच, येथील समृद्ध वनसंपदा आणि पोषक नैसर्गिक अधिवासाची साक्ष या दुर्मिळ दर्शनाने दिली असून वन्यजीव व निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
निसर्गरम्य डोंगररांगा, बारमाही वाहणारे धबधबे आणि घनदाट वनराईमुळे मार्लेश्वर परिसर धार्मिक पर्यटनासोबतच निसर्ग पर्यटनाचे मोठे केंद्र बनले आहे. या समृद्ध जंगलात भारतीय विशाल खार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेकरूचा वावर दिसून आल्याने येथील पर्यावरण वन्यजीवांसाठी किती अनुकूल आहे, हे अधोरेखित झाले आहे. आकाराने मोठा, आकर्षक तांबूस-तपकिरी रंगछटा, लांब व दाट झुबकेदार शेपटी असलेला हा प्राणी प्रामुख्याने उंच झाडांच्या शेंड्यांवर वास्तव्य करतो. झाडांच्या फांद्यांवरून लीलया लांब उड्या मारण्याची त्याची क्षमता आणि चपळता निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेणारी ठरते.
उंच वृक्षांवर पालापाचोळा व काटक्यांच्या साहाय्याने गोल आकाराची मोठी घरटी बांधून राहणारा शेकरू फळे, विविध बिया, फुले व कोवळी पाने यांवर आपला उदरनिर्वाह करतो. जंगलातील बियांचा प्रसार करून नैसर्गिक वनीकरणास मदत करणे आणि अन्नसाखळीतील समतोल राखण्यात शेकरूचे योगदान अत्यंत मोलाचे मानले जाते. सह्याद्रीच्या पट्ट्यातील या भागात त्याचे दर्शन घडल्याने मार्लेश्वरच्या वनक्षेत्राचे पर्यावरणीय संवर्धन आणि सुरक्षा अधिक बळकट करण्याची गरज निसर्ग अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.