सार्थक चव्हाणची सुवर्ण भरारी; राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत प्रथम क्रमांक; राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड
रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, अकोला व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा सन २०२६-२७ मध्ये रत्नागिरीच्या सार्थक सुरज चव्हाण याने सुवर्णपदक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.
सदर स्पर्धा दि. २ ते ४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत तालुका क्रीडा संकुल, अकोट, जिल्हा अकोला येथे पार पडली. या स्पर्धेत SRK तायक्वांदो क्लबचा खेळाडू सार्थक सुरज चव्हाण याने १९ वर्षांखालील मुलांच्या ५५ किलो वजनी गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली.
या दैदिप्यमान कामगिरीच्या जोरावर सार्थकची आगामी राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. त्याला SRK तायक्वांदो क्लबचे मुख्य प्रशिक्षक शाहरुख शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सार्थकच्या या यशाबद्दल दोन वेळा शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिंदे, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार व्यंकटेशराव कररा, सदस्य अजित गारघे, रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तायक्वांदो प्रशिक्षक मिलिंद भागवत, SRK तायक्वांदो क्लबचे अध्यक्ष अमोल सावंत, उपाध्यक्ष वीरेश मयेकर, सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य प्रफुल्ल हतिसकर तसेच समस्त पालकवर्ग यांनी त्याचे अभिनंदन केले.
सार्थकने मिळवलेले हे यश रत्नागिरी जिल्ह्यासह SRK तायक्वांदो क्लबच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरले आहे. आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने उत्तम कामगिरी करून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत.