एसटीच्या ताफ्यात १०४ नव्या बसेस दाखल
रत्नागिरीकरांचा प्रवास होणार आणखी सुखकर
रत्नागिरी– जिल्ह्यातील दुर्गम वाड्या-वस्त्यांपासून ते शहरांपर्यंत सर्वसामान्य प्रवाशांचा एसटी प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी व्हावा यासाठी दिलेला शब्द शासनाने पाळला आहे. जिल्ह्यासाठी अत्याधुनिक बसेसपैकी तब्बल १०४ नवीन बसेस एसटी महामंडळाच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. येत्या दोन महिन्यांत आणखी ४७ पर्यावरणपूरक ‘ई-शिवाई’ बसेस रस्त्यावर धावतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली.
येथील मध्यवर्ती बस स्थानकात आयोजित सोहळ्यात पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते फित कापून नूतन ‘जिजाऊ’ बसेसचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव यांच्यासह एसटीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
लोकार्पण सोहळ्यानंतर संवाद साधताना डॉ. सामंत म्हणाले, “प्रवाशांची वाढती संख्या आणि गरज लक्षात घेऊन यापूर्वी दापोली आगाराला ३५ बसेस देण्यात आल्या आहेत. त्यानंतर नव्याने ५० बसेस आल्या असून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १०४ नवीन बसेस ताफ्यात रुजू झाल्या आहेत. टप्प्याटप्प्याने रत्नागिरी विभागाला सुमारे ३०० ते ३२५ नवीन बसेस पुरवण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे ग्रामीण भागातील फेऱ्या वेळेवर होऊन प्रवाशांची, विशेषतः शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय कायमची दूर होईल.”
त्यांनी पुढे सांगितले, एस टी विभागीय कार्यालय परिसरात चार्जिंग स्टेशनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पूर्ण होताच पुढील दोन महिन्यांत ४७ ‘ई-शिवाई’ बसेस प्रवाशांच्या सेवेत रुजू होतील.