आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस दल सतर्क
नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष योजना
अमली पदार्थमुक्त रत्नागिरी आणि सायबर सुरक्षेवर भर
रत्नागिरी:-
आगामी दिवाळी सणाचा उत्सव संपूर्ण जिल्ह्यात सुरक्षित, आनंददायी आणि निर्भय वातावरणात पार पाडावा, यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल पूर्णपणे सतर्क व सज्ज झाले आहे. सणाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच सायबर फसवणूक रोखणे आणि ‘अमली पदार्थमुक्त रत्नागिरी’ या मोहिमेला गती देण्यासाठी प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सुरक्षा उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
दिवाळीनिमित्त खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता जिल्ह्यातील बाजारपेठा, महत्त्वाच्या सार्वजनिक जागा, धार्मिक आणि पर्यटन स्थळांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि गस्त वाढवण्यात आली आहे. घरफोडी, सोनसाखळी चोरी व इतर मालमत्ताविषयक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या घराची योग्य ती काळजी घ्यावी, तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ ‘डायल ११२’ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दिवाळीच्या काळात ऑनलाईन खरेदी, बनावट ऑफर्स, क्यूआर कोड, केवायसी (KYC) अपडेट, बनावट गुंतवणूक योजना आणि विविध आमिषांद्वारे सायबर गुन्हेगार नागरिकांना जाळ्यात ओढण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला OTP, UPI PIN किंवा बँक खात्याची माहिती देऊ नये आणि संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये. दुर्दैवाने सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी तात्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर किंव्हाा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.
तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासाठी आणि जिल्हा अमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलीस दल आक्रमक पावले उचलत आहे. अमली पदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी दिवाळीचा सण सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.