जे.एस.डब्ल्यू. कंपनी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी रत्नागिरीत आमरण उपोषण
प्रहार कामगार संघटनेचा आक्रमक पवित्रा
रत्नागिरी: अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या आणि कामगारांच्या वेतनावरील अन्याय दूर करण्यासाठी अखेर प्रहार कामगार संघटनेच्या वतीने तीव्र लढा पुकारण्यात आला आहे. जे.एस.डब्ल्यू. कंपनीतील कामगारांच्या न्याय हक्कांसाठी आणि वेतनवाढीच्या प्रमुख मागण्यांसाठी दिनांक २ नोव्हेंबर २०२६ पासून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरु केले असून, यासंदर्भातील अधिकृत निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.
प्रहार कामगार संघटना रत्नागिरीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कंपनीमध्ये १७ ते १८ वर्षे सलग सेवा देऊनही कामगारांना अत्यंत अपुरे म्हणजे केवळ १० ते १२ हजार रुपये वेतन दिले जात आहे. आजच्या महागाईच्या काळात गगनाला भिडलेल्या दरानुसार कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, असा गंभीर प्रश्न कामगारांसमोर निर्माण झाला आहे. कंपनी व्यवस्थापनाकडे वारंवार पाठपुरावा करून आणि संघर्ष करूनही कामगारांच्या वेतनात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही तसेच इतर समस्या देखील प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत.
यापूर्वी २३ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्रान्वये कामगारांच्या विविध मागण्याबाबतचे निवेदन प्रशासनाला व कंपनीला देण्यात आले होते आणि ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत न्याय देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र या मुदतीतही कोणतीही ठोस कारवाई किंवा सकारात्मक निर्णय न झाल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. जोपर्यंत जिंदाल कंपनीचे अधिकारी कामगारांच्या मागण्या पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा संघटनेने दिला आहे. यावेळी केवळ तोंडी आश्वासने नकोत, तर प्रशासनाच्या साक्षीने लिखित स्वरूपात न्याय हवा आहे, अशी ठाम भूमिका कामगारांनी घेतली आहे.
या आंदोलनाची प्रत माहिती व पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांच्यासह सहायक कामगार आयुक्त रत्नागिरी, पोलीस अधीक्षक रत्नागिरी, सागरी पोलीस ठाणे जयगड, तहसीलदार रत्नागिरी तसेच कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य आणि कोकण विभाग मुंबई यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. या आंदोलनात प्रहार कामगार संघटनेचे अध्यक्ष रोहन रमेश सुर्वे, उपाध्यक्ष सागर अनंत सुर्वे, सचिव सुरज मनोहर खाडे, उपसचिव अभिजित रविंद्र सावंत, खजिनदार अनिकेत तुलसीदास सुर्वे, उपखजिनदार मिलिंद अशोक आडाव, कामगार संघटक सुनील सुभाष खाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व
कामगार मोठ्या संख्येने सहभागी आहेत.
