रत्नागिरी न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी
प्रशासनाने परिसर केला खाली, कसून तपास सुरू
रत्नागिरी :
रत्नागिरी न्यायालयाच्या अधिकृत मेल आयडीवर न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाल्याने शहरभर आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी दुपारी साधारण अर्ध्या तासापूर्वी ही धमकीची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलीस ठाणे, नियंत्रण कक्ष तसेच प्रशासकीय यंत्रणा तातडीने सतर्क झाली असून, पोलिसांकडून युद्धपातळीवर कारवाई हाती घेण्यात आली आहे.
या गंभीर प्रकारची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील आपल्या ताफ्यासह आणि पोलीस स्टाफसह घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या उपाययोजनांचा भाग म्हणून बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच नगरपरिषदेची अग्निशामक यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून आपत्कालीन परिस्थितीत लागणारी सर्व यंत्रणा सध्या सज्ज ठेवण्यात आली आहे.
सुरक्षिततेची खबरदारी म्हणून पोलिसांनी न्यायालयाची संपूर्ण इमारत पूर्णपणे निर्मनुष्य केली आहे. तसेच जेएमएफसी कोर्ट आणि सेशन कोर्ट अशा दोन्ही न्यायालयांच्या इमारतींमधील नागरिकांना व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. न्यायालयाचा पार्किंग परिसर आणि आजूबाजूचा परिसर देखील पूर्णपणे रिकामा करून पोलीस प्रशासनाकडून कसून सर्चिंग आणि तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
प्राप्त झालेल्या ईमेलमधील धमकी खरी आहे की अफवा, याबाबत सध्या निश्चितपणे काहीही सांगता येत नाही, असे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी स्पष्ट केले. परंतु, मिळालेल्या माहितीची कोणतीही दस्तूरखुद्द जोखीम न पत्कता पोलिसांकडून तत्काळ सर्वतोपरी खबरदारी घेण्यात आली असून कोणतीही दुर्दैवी घटना घडू नये यासाठी संपूर्ण पोलीस प्रशासन सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सध्या न्यायालयाच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून तपास सुरू आहे.

