तुरळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
संगमेश्वर:
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. रात्रीच्या सुमारास महामार्ग ओलांडत असताना भरधाव अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या अंधारात भक्ष्याच्या शोधात किंवा अधिवास बदलण्यासाठी बिबट्या जंगल परिसरातून महामार्गावर आला असावा. याचवेळी महामार्गावरून जाणाऱ्या अज्ञात वाहनाची त्याला जोरदार धडक बसली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
सकाळी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत बिबट्याचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या जंगल परिसरात बिबट्यांसह विविध वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. अन्नाच्या शोधात तसेच अधिवास बदलताना हे वन्यप्राणी अनेकदा मानवी वस्त्या आणि महामार्गांच्या परिसरात येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.