प्रौढाकडून महिलेवर चार वर्षे लैंगिक अत्याचार
मुलाला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या संशयितावर गुन्हा दाखल
दापोली : लग्नाचा खोटा प्रस्ताव ठेवत एका महिलेशी जवळीक साधून तिच्यावर सन २०२२ पासून तब्बल चार वर्षे वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणे, तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात घडवून आणणे, अमानुष मारहाण करत तिच्या निष्पाप मुलाला ठार मारण्याची धमकी देणारा दापोलीतील काळकाई कोंड येथील मुश्ताक गफार रखांगे (वय ५०) याच्याविरुद्ध अखेर दापोली पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पीडित महिलेने दिलेल्या सविस्तर फिर्यादीनुसार, संशयित मुश्ताक याने तिची इच्छा नसताना दारू पाजून जुलै २०२२ मध्ये दापोली येथील घरी अत्याचार केले, त्यानंतर या प्रकाराची वाच्यता मुलाकडे करण्याची भीती दाखवून महाड येथील तिच्या निवासस्थानी जाऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. अत्याचारातून महिला गर्भवती राहिल्यानंतर संशयिताने दापोलीतील मेडिकलमधून गर्भपाताच्या गोळ्या आणून जबरदस्तीने दिल्या, तसेच नवीन पनवेल येथील रुग्णालयात नेऊन तिचा इच्छेविरुद्ध गर्भपात घडवून आणला. या त्रासाला कंटाळून पीडितेने महाड सोडून उलवे येथे आश्रय घेतला असता, तेथेही तिच्या नोकरीच्या क्लासमध्ये येऊन तोडफोड, शिवीगाळ, गळा दाबून मारहाण करत फोन नंबर अनब्लॉक करण्यासाठी दहशत माजवली.
संशयिताचा हा मानसिक व शारीरिक छळ असह्य झाल्यानंतर, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी कामानिमित्त दापोलीकडे जात असताना कोलाड व अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या वादानंतर पीडितेने अलिबाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली; अलिबाग पोलिसांनी सुरुवातीला शून्य क्रमांकाने नोंदवलेला हा गुन्हा पुढील कारवाईसाठी दापोली पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे. त्यानुसार दापोली पोलिसांनी संशयित मुश्ताक रखांगे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ६४(२), ११५(२), ३५१(३), ३५२ आणि ८८ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण या संवेदनशील प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.