निवळीसह कोतवडे येथे विजेच्या खांबावरून पडून दोन कंत्राटी कर्मचारी जखमी
कोतवडेत विजेच्या धक्क्यामुळे एकाची प्रकृती गंभीर
रत्नागिरी:- तालुक्यातील
निवळी बौद्धवाडी आणि कोतवडे सनगरेवाडी येथे विजेच्या खांबावर काम करताना दोन कंत्राटी कर्मचारी खाली पडून जखमी झाल्याची घटना समोर आल्या आहेत. यातील अजय कृष्णा कांबळे (रा. बौद्धवाडी, कोतवडे, रत्नागिरी) यांना विजेचा जोरदार धक्का बसल्याने गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत; तर अविनाश निवृत्त मारकवाड (वय ३४) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अविनाश मारकवाड हे शुक्रवारी सकाळी निवळी बौद्धवाडी येथे वीजखांबावर चढून काम करत होते. काम संपवून खाली उतरत असताना अचानक त्यांचा तोल जाऊन ते खाली कोसळले व त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
ते नेमके कशामुळे खाली पडले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसरी घटना मंगळवारी (ता. २७) कोतवडे सनगरेवाडी येथे घडली. अजय कांबळे हे वीजखांबावर काम करत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे ते थेट खाली कोसळले. सुरुवातीला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले आहे.