रेल्वे स्टेशन परिसरात बेवारस अवस्थेत सापडलेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी :
रत्नागिरी रेल्वे स्टेशनबाहेरील पदपथावर राहणाऱ्या एका ४५ वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संदीप प्रकाश यादव (वय ४५, मूळ रा. चापोली, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी, सध्या रा. रत्नागिरी रेल्वे स्टेशन बाहेरील पदपथ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास संदीप यादव हा रत्नागिरी रेल्वे स्टेशन ते कुवारबाव जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर, ‘संगम हॉटेल’च्या बाहेर रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला. या घटनेची माहिती खबर देणारे अर्जुन भिमा पवार यांना मिळताच त्यांनी तातडीने १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले. रुग्णवाहिकेतून संदीप यादव यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असतानाच, रात्री ८:०८ वाजण्याच्या सुमारास उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू बी.एन.एस.एस. कलम १९४ नुसार नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.