चिपळूण बसस्थानकाचा नूतनीकरणाचा आराखडा पूर्णत्वास
चिपळूण :
एसटी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या शिवाजीनगर बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्याचा आराखडा पूर्णत्वास गेला असून त्यानुसार हे बसस्थानक सात फलाटांचे साकारले जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आरक्षण कक्ष, वाहतूक नियंत्रण कक्ष, कॅन्टीनसह प्रवाशांसाठी दर्जेदार सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. असे असले तरी आराखड्याच्या टप्प्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात कधी होणार, असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित होत आहे.
मध्यवर्ती बसस्थानकातून स्थानिक पोफळी, खेड, दसपटी, खेड, मुंबई, पुणे तसेच घाटमाथ्याच्या दिशेने रवाना होणाऱ्या सर्वच एसटी बसेस या शिवाजीनगर बसस्थानकात येऊन पुढील नियोजित प्रवासरसाठी मार्गस्थ होतात. त्यामुळे एसटी वाहतूक व्यवस्थेच्यादृष्टीने शिवाजीनगर बसस्थानकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विस्तारित जागेत असलेल्या या बसस्थानकाला
सुमारे ५० वर्षाहून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत. काही वर्षांपूर्वी बसस्थानक परिसर खड्यासह धुळमुक्त करण्याच्यादृष्टीने त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आल्याने प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. तसे पाहिल्यास या बसस्थानकात प्रवासी सुविधा अपुऱ्या असून केवळ प्रवासी आसन व्यवस्था, वाहतूक नियंत्रक कक्ष याचाच समावेश आहे. फलाटाचा विचार करता स्वतंत्र फलाट नसून प्रवासी आसन व्यवस्थेसमोर बसेस येऊन उभ्या राहतात. असे असतानाच याही बसस्थानकाच्या मुख्य इमारतीचे नूतनीकरण करण्याच्यादृष्टीने एसटी महामंडळाने पावले उचलली आहेत. नूतनीकरणासाठीचा आराखडा पूर्ण झाला असून त्यानुसार शिवाजीनगर बसस्थानक सात फलाटांचे होणार असून एसटी वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार आहे. याबरोबरच प्रस्तावित
आराखड्यात स्वतंत्र आरक्षण कक्ष, वाहतूक नियंत्रण कक्ष, कॅन्टीन, स्वच्छतागृहाचाही समावेश करण्यात आला आहे. तर प्रवाशांसाठी आसन व्यवस्थेसह प्रवासी सुविधेवर अधिक भर देण्यात आला आहे. नूतनीकरणासाठीचे बांधकाम सुरू असून त्यासाठी बसस्थानकातील बहुतांशी जागा व्यापली गेल्याने उर्वरित जागेत एसटी वाहतुकीचा कसाबसा कारभार चालवला जात आहे. प्रवासी हंगामामुळे एसटी वाहतुकीचा बोजवारा उडत असल्याचा प्रकार लक्षात घेता यंदाच्या गणेशोत्सवात मध्यवर्ती बसस्थानकाऐवजी शिवाजीनगर बसस्थानकातून जादासह नियमित एसटी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली होती. या बसस्थानकातील विस्तारित जागेमुळे एसटी वाहतूकही सुरळीत होऊन प्रवाशांचा प्रवासही सुखकर झाला. प्रवासी सुविधा लक्षात घेता शिवाजीनगर बसस्थानकातील आराखड्याच्या टप्प्यानंतर तात्काळ निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करणे गरजेचे आहे. बसस्थानकातील चालक-वाहकांच्या विश्रामगृहाचीही देखभाल दुरुस्ती केली जाणार असून एसटी वाहतुकीची जबाबदारी पार पाडणाऱ्या चालक-वाहकांना विश्रांतीसाठी चांगल्या सुविधा मिळाव्यात यावर भर देण्यात येणार आहे.